उल्हासनगर दि. २५ ( प्रमोद दळवी ) : शहरातील जलपुरवठा, ड्रेनेज लाईन टाकताना रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करणे, सेंच्युरी रेयान कंपनीचे ११ कोटी रुपयांचे थकित कर माफ करण्यासंदर्भातील चौकशी अहवाल सार्वजनिक करणे, पिण्याच्या पाण्याच्या दरात करण्यात आलेली दुप्पट वाढ मागे घेणे तसेच शिवमंदिर परिसरातील ३२ बेघर नागरिकांना घरे देण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि शहरप्रमुख शिवाजी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. जलवाहिन्या आणि ड्रेनेज कामांमुळे अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे शिष्टमंडळाने नमूद केले. तसेच पाणी दरवाढ तातडीने रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राजेंद्र साहू (उपजिल्हाप्रमुख), भीमसेन मोरे (उपजिल्हाप्रमुख), कृष्ण पुजारी (विधानसभा संघटक), दिलीप मिश्रा (उपशहर प्रमुख), राजन वेलकर, भगवान मोहिते, राजू माने, अॅड. महेश फुंदे(युवा सेना शहर अधिकारी) माजी नगरसेवक प्रशांत दांडे, शिवाजी हावले (विभाग प्रमुख), आदिनाथ पालवे (विभाग प्रमुख) यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते





























