उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी ) : पावसाळा सुरू होण्याआधीच उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -३ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या मागे असलेला गौतमवाडीचा रस्ता पाण्याखाली आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

शहरातील कॅम्प नंबर -३ परिसरातील उल्हासनगर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकाच्या मागे गौतमवाडी हा परिसर आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिकांची वस्ती असून त्या परिसरातील नाल्यांचे अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणावरील काही नाल्या बुजलेल्या देखील आहेत. त्यामुळे त्या परिसरातील सांडपाणी नाल्यातून न जाता थेट रस्त्यावर उतरते. तुंबलेल्या नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर उतरत असल्यामुळे त्या रस्त्याला तलावाचे स्वरूप निर्माण होते. याशिवाय त्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू असते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना आपल्या गाड्या घेऊन जाव्या लागतात. नालेसफाईसाठी आणि रस्त्यांच्या कामासाठी महानगरपालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करत असते. पण गौतमवाडी परिसरातील रस्त्याची अवस्था जैसी थी वैशीच आहे. त्या परिसरात रस्त्याची दुरवस्था, याशिवाय नाल्याही तुंबलेल्या अवस्थेत असूनही याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच स्थानिक नगरसेवकांचे देखील याकडे लक्ष नसल्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. वेळीच या परिसरातील नाल्यांची साफसफाई केली नाही तर पावसाळ्यात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





























