उल्हासनगर दि. ३१ ( प्रमोद दळवी ) : दिवसभर रिक्षा चालून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या त्या रिक्षा चालकाची भर दुपारी त्याच्या घरासमोरून रिक्षा चोरीस गेली होती. विठ्ठलवाडी पोलिसांनी तब्बल १० दिवस त्या रिक्षाचा शोध घेऊन ती रिक्षा शोधून काढण्यास त्यांना यश आले असून त्या गरीब रिक्षा चालकाला आपली रिक्षा पुन्हा मिळाल्याने त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांचे आभार मानले आहे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील लालचक्की येथे रिक्षा चालक महादेव सरवदे हे आपल्या कुटुंबास राहतात. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपली रिक्षा घरासमोर उभी करून ठेवली होती. २० तारखेला भर दुपारी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा चोरून नेली. याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. एका गरीब रिक्षा चालकाची रिक्षा चोरीस गेल्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी डीबी पथकातील पोलिसांना ती रिक्षा शोधून काढण्यास सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भाबड, ए एस आय सुजित निचीते, पोलीस हवालदार घाणे, पोलीस हवालदार पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बुरकुल , पोलीस कॉन्स्टेबल गावित, पोलीस कॉन्स्टेबल सानप, पोलीस कॉन्स्टेबल वीर, पोलीस कॉन्स्टेबल शिरसाट असे पोलीस पथक तब्बल १० दिवस या रिक्षाचा शोध घेत होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बाबा प्राईम जवळ रमेश केने चौक उल्हासनगर -४ येथे दोन लहान मुले संशयितरित्या रिक्षा चालवत असताना मिळून आले. सदर रिक्षा बाबत त्यांच्याकडे विचारपूस केले असता ते उडवलीचे उत्तर देत होते
पोलीसांनी त्या रिक्षाबाबत पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळून पाहिला असता ती रिक्षा ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २५५ /२०२६ बी एन एस कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही विधी संघर्ष बालक व रिक्षा चोरीस गेलेल्या घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीवी फुटेज मधील विधी संघर्ष बालक हेच असल्याने सदर रिक्षा दोन पंचा समक्ष पंचानामा करून ई-साक्ष करून सदरची रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या दोन्हीविधी संघर्षित बालकांकडे पोलीस अधिक चौकशी करीत असून त्यांनी या आधी देखील असे चोरीचे गुन्हे केले आहेत का याचीही माहिती पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत. चोरीस गेलेली रिक्षा विठ्ठलवाडी पोलिसांनी शोधून काढल्याने त्या गरीब रिक्षा चालकाने पोलिसांचे आभार प्रकट केले आहे. रिक्षाही आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाचे साधन असल्याने आणि ती रिक्षा आपल्याला पोलिसांनी शोध घेऊन परत मिळून दिल्याने पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्या रिक्षा चालकाने आणि परिसरातील नागरिकांन कौतुक केले आहे. प्रत्येक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा पार्क करून ठेवताना त्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी सर्व रिक्षा चालकांना सांगितले आहे.





























