– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार कार्यक्रम
– खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने विकासकामांची उभारणी
कल्याण दि.१६ : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागत असून शहरांना एक नवी ओळख प्राप्त होत आहे. याच पद्धतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीतील विविध विकासकामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार १८ मे रोजी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात सायंकाळी ४.३० वाजता या विविध प्रकल्पांचा अनावरण आणि भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. यामध्ये मानपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील पुतळ्याचे अनावरण, खंबाळपाडा येथील अद्ययावत सुविधांनी युक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन पार पडणार आहे. तर रिंग रोड टप्पा २ मधील बाधितांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. याच समवेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या पेन्शन योजनेच्या लाभार्थी कर्मचाऱ्यांना धनादेश वाटप, कल्याण झोन – ३ अंतर्गत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना (दामिनी पथक) १६ दुचाकींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच टिटवाळा पूर्व आरक्षण क्र. ५४ येथे नव्याने उद्यानाची उभारणी करण्यात आली असून याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध पायाभूत सुविधांची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पासमवेतच, शहर स्वच्छता, शहर सुशोभीकरण, वारसा आणि संस्कृती जपत शहरांमध्ये आपल्या महापुरुषांचे पुतळे उभारणे यांसारखी अनेक कामे मार्गी लागत आहे. याच पद्धतीने कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारीत विविध विकासकामे मार्गी लागत असून त्यांचे भूमिपुजन तर मार्गी लागलेल्या विकासकामांचे अनावरण करण्यात येणार आहे.
डोंबिवली येथील घारडा सर्कलचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात आले. याचठिकाणी नुकताच शिवरायांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला. यानंतर आता मानपाडा येथे खासदार डॉ.शिंदे यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीत बसलेल्या पुतळा बसविण्यात आला आहे. याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर खंबाळपाडा येथील अद्ययावत सुविधांनी युक्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन पार पडणार आहे. यामुळे आसपासच्या खेळांडूना विविध सुविधांनी युक्त असे क्रीडासंकुल खेळाडूंना उपलब्ध होणार आहे.
तर कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन यातील बाधितांना योग्य तो मोबदला देण्यात आला आहे. तसेच यातील बाधित नागरिकांना सदनिका देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील टप्पा २ येथील बाधितांना कचोरे येथे तयार असलेल्या बीएएसयूपीच्या इमारतीमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्यात येत असून या सदनिकांचे हस्तांतरण देखील करण्यात येणार आहे. तसेच यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाच्या लाभार्थी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेच्या धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी कल्याण झोन – ३ अंतर्गत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना १६ दुचाकींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच कल्याण पश्चिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे देखील उदघाटन करण्यात येणार आहे.





























