- एसएसटी महाविद्यालय आणि स्मार्ट फाउंडेशन आयोजित
उल्हासनगर दि .१८ : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त, स्मार्ट फाउंडेशन आणि एस.एस.टी. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘कवितेतला भीमराव’ या आगळ्यावेगळ्या गीतकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणिवा जागवणारा हा कार्यक्रम एस.एस.टी.महाविद्यालयाच्या सभागृहात रसिकांच्या उस्फूर्त उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांच्या हस्ते झाले. तर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या व स्मार्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा वसुंधरा मोरे-केदारे होत्या. सुप्रसिद्ध गीतकार डॉ.विनायक पवार आणि कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांचे कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात अंबरनाथ नगर परिषदेच्या माजी नगरअध्यक्षा मनीषा वाळेकर, जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज शेलार, नाना पवार (म.प्र. प्रदेश सचिव, रिपाई आठवले गट), साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव, मा. कार्यकारी अभियंता दिलीप बागुल आणि उपप्राचार्य प्रा.डॉ.दिपक गवादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ दिलीप वाळंज यांना ‘ब्लू सन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

गायक आय. एम.मोरे, भारत अंबवणे, शाहीरा ऐश्वर्या पवार यांची साऊ, वैशाली पगारे याची भिमराज की बेटी,आणि सचिन सरदार यांनी सामाजिक चळवळीवर आधारित भावस्पर्शी गीतगायन केली. तर राज असरोंडकर यांच्या अनोखी भीमवंदनेने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुवर्णा अहिरे, प्रा. प्रफुल केदारे आणि प्रा.वृषाली विनायक यांनी उत्तमरित्या पार पाडले. भारावून टाकणाऱ्या निवेदन शैलींमुळे संपूर्ण कार्यक्रम प्रवाही झाला.
काव्यवाचन सत्रात कवी जितेंद्र लाड, मंगेश सरदार, डॉ. नरसिंग इंगळे, श्रीकांत बागुल, किरण भिलारे, सोनाली जाधव आणि प्रा. डॉ. दीपक गवादे यांनी सामाजिक विषयांवर प्रभावी कविता सादर केल्या. या कवितांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, समतेचा मूलमंत्र आणि नवभारताची दिशा ठळकपणे समोर आली.

‘कवितेतला भीमराव’ हे कविसंमेलन म्हणजे केवळ साहित्यप्रेमींना दिलेले पर्व नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले प्रभावी पाऊल ठरले. कवितांच्या माध्यमातून विचारांची मशाल प्रज्वलित करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ तेवत राहील, यात शंका नाही अशी भावना अरुण म्हात्रे व्यक्त केली.
तर, ‘कवितेतला भीमराव’ हे कविसंमेलन म्हणजे एक वैचारिक सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. अशी प्रतिक्रिया उद्घाटक व एस एस टी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी यावेळी व्यक्त केली





























