उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही उल्हासनगर शहराची मोठी समस्या बनली आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या समस्येवर आता उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी हायटेक उपाययोजना सुरू केली असून Google Maps वरील वाहतुकीच्या स्थितीवर कंट्रोल रूममधून थेट नजर ठेवण्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असलायचे उल्हासनगर वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी सांगितले . या अभियानाचा शुभारंभ आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात कंट्रोल रूमच्या धर्तीवर स्वतंत्र स्क्रीन सुरू करण्यात आली आहे. या स्क्रीनवर Google Maps वरील विविध भागांमधील वाहतुकीची स्थिती सतत पाहिली जाते. एखाद्या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने Google Maps वर लाल रंगाचा ट्रॅफिक सिग्नल दिसताच त्या ठिकाणी तातडीने पोलिस कर्मचारी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशिक्षित अमलदारांची विशेष नियुक्ती
या हायटेक व्यवस्थेसाठी वाहतूक पोलिसांनी दोन प्रशिक्षित अमलदारांची नियुक्ती केली आहे. हे अमलदार कंट्रोल रूममध्ये बसून शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीच्या स्थितीवर लक्ष ठेवतात. एखाद्या परिसरात अचानक वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पॉईंटवर तातडीने कोणता कर्मचारी किंवा अधिकारी पाठवायचा, याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिसांची मदत पोहोचवली जाते.यामुळे वाहतूक कोंडी वाढल्यानंतर नागरिकांकडून तक्रार येण्याची वाट पाहण्याऐवजी कोंडीची प्राथमिक माहिती मिळताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गर्दीच्या वेळेत विशेष फायदा
उल्हासनगरमधील अनेक रस्ते तुलनेने अरुंद असून, शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी वाहनांची किरकोळ अडचण निर्माण झाली तरी काही मिनिटांत त्याचा परिणाम आजूबाजूच्या रस्त्यांवर होऊन मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा परिस्थितीत Google Maps वर दिसणाऱ्या ट्रॅफिकच्या संकेतांचा वापर करून वाहतूक पोलिसांना परिस्थितीचा अंदाज घेता येणार आहे. संबंधित ठिकाणी कर्मचारी पोहोचवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ वाया जाण्याबरोबरच रुग्णवाहिका, शाळेची वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होतो. त्यामुळे कोंडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस यंत्रणा अधिक गतिमान करण्याचा हा प्रयत्न असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. “Google Maps वर वाहतुकीच्या ठिकाणी लाल रंग दिसताच संबंधित पॉईंटवर तातडीने कर्मचारी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी दोन प्रशिक्षित अमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून ते कंट्रोल रूममधून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवतात. वाहतूक कोंडी निर्माण होण्यापूर्वीच किंवा ती वाढण्यापूर्वी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे,” अशी माहिती उल्हासनगर वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत यांनी दिली.
‘स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’कडे पाऊल
उल्हासनगरसारख्या दाट लोकवस्तीच्या आणि अरुंद रस्त्यांच्या शहरात पारंपरिक वाहतूक नियंत्रणासोबत तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक बनले आहे. Google Maps वरील ट्रॅफिक अपडेटचा वापर करून प्रत्यक्ष रस्त्यावर पोलिसांची तातडीने हालचाल करण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील इतर गर्दीच्या भागांमध्येही ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाण्याची शक्यता आहे.Google Maps वर कोंडीची माहिती, कंट्रोल रूममधून तात्काळ निर्णय आणि घटनास्थळी पोलिसांची धाव अशा त्रिसूत्रीच्या माध्यमातून उल्हासनगरच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हायटेक मास्टर प्लॅनच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.





























