उल्हासनगर दि.११ : उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी ठाणे पोलिस आयुक्त , परिमंडळ ४ पोलिस उपायुक्त व मुख्य नियंत्रक पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटना (PESO),सीबीडी,नवी मुंबई ह्यांच्या कडे लेखी व ईमेल द्वारे उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील (विशेषतः नेरू चौक उल्हासनगर-२ परिसर) व सर्व कायमस्वरूपी फटाक्यांचे विक्रेतांवर नागरिकांच्या सुरक्षेचा हेतूने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रोहित साळवे यांनी दिलेल्या निवेदनात अशे उल्लेख केले आहे की उल्हासनगर शहरातील फटाके विक्रेता मोठ्या प्रमाणात साठा ठेवत आहेत. नियमांनुसार, तयार फटाक्यांचा साठा ३०० किलोपेक्षा जास्त आणि चिनी फटाके किंवा स्पार्कलर १२०० किलोपेक्षा जास्त ठेवता येत नाही. मात्र, बहुतांश विक्रेत्यांकडून या मर्यादेचे उल्लंघन होत आहे. सदर दुकानदारांकडे PESOच्या पश्चिम मंडळ, विस्फोटकांचे संयुक्त मुख्य नियंत्रक विभागाकडून देण्यात आलेला २००२ च्या स्फोटक नियमांतील फॉर्म LE-5 मधील परवाना (License in Form LE-5 of Explosives Rules, 2002) आहे की नाही? याची खात्री करणे आवश्यक आहे.
उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात होलसेल फटाक्यांची दुकाने आहेत, जिथे संपूर्ण तालुक्यातून लोक खरेदीसाठी येतात. परंतु, असे आमच्या निदर्शनास आले आहे की, अनेक फटाके विक्रेते फटाक्यांच्या विक्रीसाठी लागू असलेल्या कायद्यांचे योग्य पालन करत नाहीत. विशेषतः:१ .ठराविक मर्यादेपेक्षा अधिक साठा दुकानात ठेवला जातो, जो नियमांचे उल्लंघन आहे. २. फटाक्यांचा साठा गोडाऊनमध्ये ठेवण्याची सक्ती असतानाही तो दुकानातच साठवला जात आहे. ३.ठरवलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने चालू ठेवली जात आहेत.या परिस्थितीत, अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर आपल्या विभागाने योग्य ती कारवाई करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ छापे टाकून तपासणी करण्यात यावी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये. जर या संदर्भात कोणतीही दुर्घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, अशे निवेदनात नमूद केले आहे.





























