उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय सावकारे यांनी मेळ्याला भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वाधारीया ,सिंधू शर्मा, विनोद माखीजा यांच्यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळ्यात प्रदर्शित करण्यात आलेले आधुनिक परिधान, नव्या फॅशन डिझाइन्स आणि स्थानिक उद्योजकांचे नावीन्यपूर्ण उत्पादन पाहून उद्योगमंत्री संजय सावकारे यांनी समाधान व्यक्त केले. उल्हासनगरचा गारमेंट उद्योग केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे उद्योगाभिमुख मेळे स्थानिक उद्योगांना चालना देण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले की, उल्हासनगर गारमेंट फेअर हे शहराच्या वस्त्रोद्योगाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. आयोजकांनी केलेल्या नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. उद्योगांच्या विकासासाठी तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यंदाच्या UGF 3.0 ची “Bigger, Better, Bolder” ही संकल्पना विशेष आकर्षण ठरली. देशभरातून आलेले व्यापारी, खरेदीदार आणि उद्योग प्रतिनिधींनी मेळ्यात सहभागी होत नव्या व्यावसायिक संधींचा शोध घेतला. आधुनिक फॅशन ट्रेंड, उच्च दर्जाचे परिधान आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन यामुळे मेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समारोप प्रसंगी उद्योगमंत्री संजय सावकारे, आमदार कुमार आयलानी आणि उपस्थित मान्यवरांनी यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, प्रदर्शक, व्यापारी आणि सहभागींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आगामी काळात उल्हासनगर गारमेंट फेअर अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात आयोजित होऊन शहराच्या गारमेंट उद्योगाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी उंची प्राप्त करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




























