उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : गांजा या अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी उडीसा राज्यातून उल्हासनगरात आलेल्या दोन जणांना अंबरनाथ मधील एका रिक्षा चालकासह उल्हासनगर गुन्हे शाखा घटक – ४ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २१.५८४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ सुमारे ८,६३,३६०/-किमतीचा व रिक्षा आणि तीन मोबाईल फोन असा ९,३५,३६०/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्याची कामगारी केली आहे.
पोलीस सूत्राने दिले माहितीनुसार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग व घरपोडी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडत असल्याने उल्हासनगर गुन्हे शाखा घटक -४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय काजारी, पोउपनि अशोक पवार, पोहवा/३१७७ प्रकाश पाटील, पोहवा/११२५ रितेश वंजारी, पोहवा/१४०३ सतिश सपकाळे, पोहवा/३३४९ चंद्रका सावंत, पोशि/७७०२ बाबूलाल जाधव, पोशि/३६४९ रामदास उगले, पोशि/७२०१ प्रसाद तोंडलीकर असे पोलीस पथक दुपारी ४ वाजता गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी पोलीस शिपाई बाबूलाल दिनकर जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने उल्हासनगर -१ येथील अमरडाय कंपनीच्या बाहेरील ओसाड सार्वजनिक रोड वरून MH05-CP-5555 या क्रमांकाची एक रिक्षा जाणार असून त्या रिक्षात गांजा हा अमली पदार्थ असल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलीस शिपाई बाबूलाल जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी भरधाव वेगने येणाऱ्या त्या संशयित रिक्षाला पोलीस शिपाई बाबूलाल जाधव यांनी थांबवले. त्या रिक्षात मागे बसलेला दोघांच्या हालचालीवर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्या रिक्षाची तपासणी केली. त्यावेळी त्या दोघांकडे असलेल्या बॅगची पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्या बॅगमधून २१.५८४ ग्रॅम वजनाचा गांजा सुमारे ८,६३,३६०/- रू किमतीचा पंचनामा करून ताब्यात घेतला. गांजा हा अमली पदार्थ त्यांनी बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. याशिवाय ज्या रिक्षातून हे दोघे चालले होते त्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन एक रिक्षा व २१.५८४ ग्रॅम वजनाचा गांजा असा सुमारे ९,३५,३६०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ताब्यात घेतलेल्या तिघांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता १) बिकास बिकरम रणबैसा (२६), धंदा शेती, रा. संजाममूरा, निमीत्री, पो.स्टे. किशोरनगर, जि. अनंगूल, राज्य उडीसा २) सुधीर धरूबा रणबैसा ( २७ ) रा. उडीसा. व ३) हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख ( ५१ ) धंदा रिक्षा चालक रा. अंबरनाथ अशी त्यांचे नावे असल्याचे पोलिसांना समजले. या प्रकरणी पोलीस शिपाई बाबूलाल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध एन.डी.पी.एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त ( शोध-१ ) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर गुन्हे शाखा घटक -४ च्या पोलिसांनी ही कामगिरी केली.




























