शहाड दि. २५ ( प्रमोद दळवी ) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहाड येथील श्री विठोबा-रुक्मिणी मंदिरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. शहाड गावठाण तसेच परिसरातील विविध भजन मंडळांनी सादर केलेल्या हरिपाठ, भजन, कीर्तन आणि अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.

आषाढी एकादशीचे औचित्य साधत कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, सेंच्युरी रेयॉन, बी. के. बिर्ला महाविद्यालय, बी. के. बिर्ला रात्र महाविद्यालय, बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सरला बिर्ला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ज्ञान दिंडी काढण्यात आली. बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण येथून प्रारंभ झालेल्या या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि विठ्ठलनामाचा अखंड जयघोष करत ही दिंडी शहाड येथील श्री विठोबा-रुक्मिणी मंदिरात पोहोचली.

या ज्ञान दिंडीद्वारे पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. भगवान श्री विठोबा-रुक्मिणी यांच्या भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान स्थानिक उद्योजक, समाजसेवक तसेच विविध धार्मिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांशी निगडित प्रमुख पाहुणे महेश अग्रवाल यांनी सपत्नीक भगवान श्री विठोबा-रुक्मिणी यांची विधिवत पूजा-अर्चा करून दर्शन घेतले. त्यांच्यासोबत कल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त ओ. आर. चितलांगे, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी तसेच उद्धव रूपचंदानी यांनीही सपत्नीक पूजा करून विठ्ठल-रुक्मिणींचे आशीर्वाद घेतले.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी सुरळीत व्यवस्था, रांग व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता तसेच इतर आवश्यक सोयींची विशेष व्यवस्था केली होती. त्यामुळे दिवसभर भाविकांनी कोणताही त्रास न होता शांततेत दर्शनाचा लाभ घेतला.या सोहळ्यास उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे, कपिल पाटील, शुभला गायकवाड, प्रमोद हिंदूराव, केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी, राहुल दामले, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, सेंच्युरी रेयॉनचे युनिट हेड दिग्विजय पांडेय, श्रीकांत गोरे, बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे शिक्षा निदेशक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डॉ. हरीश दुबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी भगवान श्री विठोबा-रुक्मिणींची पूजा-अर्चा करून राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय आणि समाजोपयोगी उपक्रमामुळे शहाड परिसरात भक्ती, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





























