- भीमराव पांचाळे, सतीश पुळेकर, के. राघवकुमार आणि प्रभाकर तोडणकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार‘ प्रदान
मुंबई दि. १ : लघुपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित चौथ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा ३० एप्रिल रोजी परेल येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. चित्रपट, नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष झळाळी प्राप्त झाली होती. या महोत्सवात त्यांच्या संबंधित क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन भीमराव पांचाळे (प्रसिद्ध गझल गायक – गझल नवाज), सतीश पुळेकर (ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक),के. राघवकुमार (ज्येष्ठ नाट्यकर्मी) आणि प्रभाकर तोडणकर (ज्येष्ठ समाजसेवक) यांनागौरविण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ सुनील शिर्के (संस्थापक, शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान) यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. कवी शब्दश्री विलास देवळेकर यांनी सादर केलेल्या भारदस्त ‘गाऱ्हाण्याने’ सोहळ्याची मंगलमय सुरुवात झाली. आयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी प्रास्ताविकातून महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला, तर एका व्हिडिओ फितीच्या (AV) माध्यमातून या सोहळ्याचा तीन वर्षांचा प्रवास उलगडण्यात आला. याप्रसंगी गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी गझल गाऊन उपस्थित मान्यवर आणि रसिकांची दाद मिळवली. आपले मनोगत व्यक्त करताना भीमराव पांचाळे म्हणाले की, “महेश्वर तेटांबे हे नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. विजेत्यांना रोख रक्कम देऊन प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे.” ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर म्हणाले की, जीवनगौरव पुरस्काराने जरी मला सन्मानित केलं तरी अजूनही काम करण्याची ऊर्मी माझ्यात आहे. आणि “महेश्वर तेटांबे हे नवीन कलाकारांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जे प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळवून देत आहेत ही कौतुकास्पद कामगिरी आहे.”

या सोहळ्यात विनोदवीर आशिष सातपुते, एम नटराज, संदीप भाकरे, समीर काळबे आणि नृत्यांगना कु. ग्रीष्मा वहाळकर यांच्या सादरीकरणाने रंगत आणली. प्रसिद्ध अभिनेते व मुलाखतकार मयूर धुरी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रभावी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर अभिनेते कांचन पगारे, अभिनेत्री सिद्धी कामथ, गुरुनाथ तिरपणकर, उद्योजक खलील शिरगावकर, लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार आणि अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अजीत साकरे, सुरेश गुरव, देवेंद्र पेडणेकर, अविनाश राऊत, राहुल शिंदे, पत्रकार केतन भोज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मान्यवर प्रमुख उपस्थितांच्या हस्ते रंगकर्मी ,कलाभूषण आणि समाजभूषण हे पुरस्कार देखील देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी महेश्वर तेटांबे यांनी भावूक होत सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, “चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो; त्याला स्वतःला किंमत नसते, पण दुसऱ्यासोबत जोडला तर त्याची किंमत वाढते. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हा प्रवास इथवर पोहोचला आहे.” राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.






























