अंबरनाथ दि. २ (प्रमोद दळवी) : अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगा नगर परिसरातील प्रिसिअस गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये वेटिंग रूम मधील सोफ्याखाली एक विषारी पाच फुटी लांबीचा नाग लपून बसला होता. सोसायटी मधील रहिवाशांना या नागाची माहिती मिळताच त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. रहिवासी प्रसाद जाधव यांनी लगेच सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना या नागा बाबत माहिती दिली. प्रकाश गोहिल यांनी लगेच त्या ठिकाणी येऊन सोफ्याखाली दडून बसलेल्या नागाला शोधून ताब्यात घेतले. नागाला पकडल्यावर नागरिकांच्या मनातली भीती दूर झाली. प्रकाश गोहिल यांनी त्या नागाला जंगलात सोडले आहे .

हा नाग त्या बिल्डिंगच्या परिसरातूनच घरात शिरला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. पकडलेला नाग हा पाच फुट लांबीचा विषारी नाग होता. आता अति उष्णता सुरू झाल्याने थंड वातावरणाच्या ठिकाणी येऊन हे साप बसत असल्याचे गोहिल यांनी सांगितले. अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगा नगर परिसरात मोठ्या प्रमाणात दरवर्षी साप निघत असल्याचे प्रकाश गोहिल यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.





























