उल्हासनगर दि १३ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिलाय. कचरा उचलण्यावर दिवसाला साडेआठ लाख खर्च महापालिका करते. कोणार्क कंपनीने गेल्या एक महिन्यापासून कामगारांना पगार दिलेला नाही असे कामगार सांगत आहेत. कचरा उचलणाऱ्या ७०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाहीये. कामगारांचे ७ तारखेला पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाले आहे . कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी वेतन नाही तोपर्यंत काम बंद अशी भूमिका घेतल्याने शुक्रवारी काम बंद आंदोलन कामगारांनी सुरु केले आहे. दरम्यान कामगार हे तुटपुंजा पगारात काम करत असल्याचा आरोप कामगार करत आहेत.

या बाबत कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी सांगतले कोणार्क कंपनी प्रशासनाकडून दर महिन्याला पगार देण्याबाबत दिरंगाई केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य कामगार जे शहराची स्वच्छता करतात त्यांचं महिन्याभराचं गणित बिघडून जाते. कामगारांना पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. आता शैक्षणिक वर्ष चालू होत आहे. मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत. मुलांना लागणारा गणवेश त्यांना लागणारी पुस्तके, दप्तर घ्यायचे आहेत. पण १३ तारीख आली तरी अद्याप कंपनी प्रशासनाने कामगारांचा पगार दिला नसल्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय पावसाळाही सुरू झाला आहे. कोणाला घरावर प्लास्टिक टाकायचं आहे तर कोणाला घराची डागडूजी देखील करायचे आहे. याशिवाय कोणाला बँकेचा हप्ता देखील द्यायचा आहे. पण पगार वेळेवर मिळत नसल्याने बँकेचा हप्ता देखील वेळेवर भरता येत नाही. त्यामुळे चेक बाउन्स साठी त्यांना सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतात. अशा कामगारांचे बँकेचे सिव्हिल सुद्धा खराब होतात. याला जबाबदार कोण आहे. भर पावसात देखील कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेकडे लक्ष देत असतात. शहरात स्वच्छता ठेवतात. पण त्यांना वेळेवर पगार का दिला जात नाही असा संतप्त सवाल संदीप गायकवाड यांनी केला आहे.

संदीप गायकवाड म्हणाले मी कंपनी प्रशासन व महानगरपालिकेला विचारतोय की या सर्व सामान्य कामगारांना न्याय कोण देणार त्यांना वेळेवर पगार कोण देणार जर महानगरपालिका इन्स्ट्रक्शन देते तर कंपनी या कामगारांकडून गुराढोरासारखा काम करून घेते. नियमानुसार सर्व कामगारांना १० तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे. कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा १३ तारीख झाली तरी पगार नाही ,उद्या शनिवार ,रविवार आहे तो पगार पंधरा तारखेपर्यंत जाईल. जोपर्यंत कामगाराचा या महिन्यात पगार येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील असा इशारा संदीप गायकवाड यांनी कोणार्क कंपनीला दिला आहे.





























