उल्हासनगर दि.१२ : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात नागरिकांमध्ये अंतर्गत सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कल्याण येथील मॅक्सी ग्राउंडवर आयोजित मॉक ड्रिलमध्ये एसएसटी महाविद्यालय, उल्हासनगर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या मॉक ड्रिलमध्ये नागरी संरक्षण दल ठाणे – कल्याण, पोलीस प्रशासन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्वसंरक्षण कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. एसएसटी महाविद्यालयाचे स्वयंसेवक पूर्ण शिस्तबद्ध आणि उत्साही पद्धतीने सहभागी होत आपत्ती व्यवस्थापनातील आपली तत्परता दाखवून दिली.

गौरवाची बाब म्हणजे, या स्वयंसेवकांनी यापूर्वीही अनेक नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून (NDRF) शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे मूलभूत ज्ञान आत्मसात केले आहे.एसएसटी महाविद्यालयाच्या NSS युनिटचा हा उपक्रम महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीची आणि विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने घेतलेल्या सकारात्मक पावलांची साक्ष देतो.






























