उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी ) : भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर येथील कार्यालयात सोमवारी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR)) या विषयावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत SIR संदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील कामकाजाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नागरिकांपर्यंत SIR संदर्भातील योग्य व अचूक माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले. तसेच संघटनात्मक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहून जनजागृतीचे काम प्रभावीपणे करण्यावर त्यांनी भर दिला. पक्षाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीत SIR प्रक्रियेबाबत उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन कसे करावे, जनजागृती अभियान अधिक व्यापक कसे राबवावे आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे लोकांपर्यंत कशी पोहोचवावी, याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधरिया, उपमहापौर अमर लुंड, बीएलओ प्रमुख प्रशांत पाटील, माजी महापौर मीना आयलानी, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सचिव लता पगारे, महासचिव अर्चना करनकाळे, महिला मोर्चा अध्यक्षा मंगला चांडा, महासचिव विनोद गोवानी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्देशांचे पालन करत SIR संदर्भातील जनजागृती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.






























