उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी ) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी केले आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer – BLO) मतदारांच्या घरी भेट देऊन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) उपलब्ध करून देणार आहेत. मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह हा फॉर्म काळजीपूर्वक भरून ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी संबंधित BLO यांच्याकडे जमा करावा. ज्या मतदारांकडून गणना फॉर्म प्राप्त होईल, त्यांचाच समावेश मसुदा मतदार यादीत करण्यात येणार आहे.
मतदार यादीतील अपात्र, मृत, स्थलांतरित तसेच दुबार नावे वगळून मतदार यादी अधिक विश्वासार्ह आणि अद्ययावत करण्यासाठी ही व्यापक पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २००२ नंतर प्रथमच अशा स्वरूपाची व्यापक पडताळणी होत असल्याने प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय, नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी आवश्यक घोषणापत्र (Declaration Form) सादर करणे बंधनकारक आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान तक्रार किंवा अपील दाखल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी मतदार हेल्पलाइन क्रमांक १९५० वर संपर्क साधावा किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. BLO आपल्या घरी भेट दिल्यानंतर त्यांना आवश्यक माहिती, कागदपत्रे आणि सहकार्य करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) २०२६ मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी १४१ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी उल्हासनगर विजयानंद शर्मा यांनी केले आहे .याबाबतची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली.





























