उल्हासनगर दि. २८ ( प्रमोद दळवी ) : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने गुवाहाटी (आसाम) येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती मिळून प्रभागातील विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे उप आयुक्त (मुख्यालय) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दिनांक २२ जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत गुवाहाटी येथे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाबाबत उल्हासनगर महानगरपालिका सचिव कार्यालयामार्फत कार्यालयीन परिपत्रक काढून सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पूर्वसूचना व आवश्यक माहिती देण्यात आली होती. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी लेखी संमतीपत्र तसेच महापौर अश्विनी कमलेश निकम यांचे शिफारस व संमतीपत्र सादर केले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांनी नगरसेवकांच्या जाण्या-येण्याच्या प्रवास खर्चासह प्रवास भत्ता आदींसाठी एकूण ७६ नगरसेवकांकरिता सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली होती.

या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गामध्ये लोकप्रतिनिधींना महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावीपणे काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये १) सभाशास्त्र व कामकाज : महापालिका सभांचे नियम आणि कायदेशीर प्रक्रिया.२) मुद्दे व प्रश्नांची मांडणी : महासभेत प्रभागातील समस्या, जनहितार्थ मुद्दे व प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य.३) विषय संचिका (फाईल) निर्मिती: प्रशासकीय कामकाज समजून घेणे व विषयानुसार अचूक संचिका तयार करणे.४) प्रभाग विकास व नियोजन : प्रभागातील विविध विकासकामे, निधीचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता.
प्रशिक्षणादरम्यान नगरसेवकांना केवळ सैद्धांतिक माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रिया, विषयांचे सादरीकरण आणि विकासकामांच्या नियोजनाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे लोकप्रतिनिधींना महापालिकेच्या कामकाजाची अधिक चांगली समज निर्माण होऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेतला. या प्रशिक्षणामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या-आपल्या प्रभागात अधिक कार्यक्षमतेने, अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि प्रशासकीय नियमांची जाण ठेवून काम करता येणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेतही सकारात्मक वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे.





























