उल्हासनगर, दि. २३ ( प्रमोद दळवी ) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगर महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक-४ ची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आरोग्य केंद्रालाही धोका निर्माण झाला असून भिंतींना तडे गेल्याने ती धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राची तातडीने पुनरबांधणी करण्याची मागणी महापालिका आरोग्य समितीच्या सभापती सविता तोरणे-रगडे यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक-३ येथील महापालिका मुख्यालयाच्या मागील परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक-४ कार्यरत आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे आरोग्य केंद्राच्या संरक्षण भिंतीचा मोठा भाग कोसळला. भिंत कोसळल्यानंतर आरोग्य केंद्रालाही धोका निर्माण झाला असून, भिंतींमध्ये तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती मिळताच महापालिका आरोग्य समितीच्या सभापती सविता तोरणे-रगडे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी आरोग्य केंद्राची सद्यस्थिती गंभीर असल्याचे सांगत, नागरिकांच्या तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.





























