उल्हासनगर दि १७ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत मुंबई येथील नंदनवन येथे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीस महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, जेष्ठ नगरसेवक जमनू पुरस्वनीजी, महेश सुखरमानीजी, कमलेश निकम, शिवाजी रगडे, सार्वजनिक बांधकाम सभापती दीप्ती नवीन दुधानी, माजी नगरसेवक सुरेश रमेश चैनानी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उल्हासनगर शहराच्या विकासकामांबाबत तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत विविध विषय मांडण्यात आले.
महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या मागणी नुसार बैठकीत एमएमआरडीए अंतर्गत १०० कोटी रुपयांच्या प्रमुख रस्ते विकास कामांना मंजुरी देण्यास कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासंदर्भात तात्काळ आदेश देण्यात आले. अंबरनाथ, कोल्हापूर आणि पाचोरा परिसरातील रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसा थांबवून त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे ठरवण्यात आले.नगरसेविका सविता तोरणे रगडे यांच्या मागणीनुसार पॅनेल क्रमांक ११ व १२ मधील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एमआयडीसी कडून अतिरिक्त २ एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांच्या मागणीनुसार मध्यवर्ती रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन ४०० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाची मागणी करण्यात आली.
यावर उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून दिनांक २० मे रोजी उल्हासनगरला भेट देण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत उल्हासनगर शहराच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.




























