उल्हासनगर दि. २ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगर १४१ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलानी यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांना निवेदन सादर करून १२ मार्चपासून पाणी कर आणि मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याची मागणी केली आहे.
आमदार कुमार आयलानी यांनी आपल्या नेवेदनात नमूद केले आहे की वाहतूक विभागामार्फत उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी अभय योजना सुरू करण्यात येत आहे. नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम अत्यंत स्वागतार्ह आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेने देखील दिनांक १२ मार्चपासून १४ मार्च पर्यंत पाणी कर व मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्यात आली, तर शहरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच थकीत कर वसुलीत गती येऊन महानगरपालिकेच्या महसुलातही लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल असे आमदार कुमार आयलानी यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
जनहित व महानगरपालिकेच्या आर्थिक बळकटीकरणाचा विचार करून दिनांक १२ मार्चपासून १४ मार्च पर्यंत पाणी कर व मालमत्ता करासाठी अभय योजना लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी व विनंती निवेदनाद्वारे केली आहे.





























