उल्हासनगर दि ३ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेत महायुतीचा महापौर बसला असून शिवसेनेच्या अश्विनी कमलेश निकम यांची महापौर पदी तर भाजपकडून अमर लुंड यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भाजपा व शिवसेना यांची महायुती असली तरी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक २०२५-२६ च्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना हे स्वबळावर निवडणूक लढले होते. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागला. त्यात भाजपाचे ३७ नगरसेवक तर शिवसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले होते. उल्हासनगर महानगरपालिकेत महापौर कोणाचा बसणार यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा सुरू होती. भाजपाला तीन तर शिवसेनेला चार नगरसेवकांची पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी गरज होती. शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक व वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा, एक साई पक्ष व एक अपक्षचा पाठिंबा मिळाल्याने. शिवसेनेच्या ४० नगरसेवकांच्या गटांनी कोकण आयुक्तांकडे नोंदणी करून घेतली होती .

दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करून आपल्याच महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिवसेने खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर शिवसेना भाजपा यांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला .ठरलेल्या समझोतानुसार महापौर पद शिवसेनेकडे तर उपमहापौर पद भाजपाकडे देण्यात आले.

शुक्रवारी ३० जानेवारी रोजी महायुतीच्या वतीने महापौर पदासाठी शिवसेनेच्या अश्विनी कमलेश निकम आणि उपमाहापौर पदासाठी भाजपचे अमर लुंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते . दुसरे कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती . मंगळवारी ३ फेबुवारी २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर व उपमहापौर औपचारिक निवडणूक पिठासीन अधिकारी मनुज जिंदल यांच्या देखरेखीखाली आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडून आलेल्या ७८ नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. महापौर व उपमहापौरांच्या औपचारिक निवडणुकीची प्रक्रिया सभागृहात पार पडली. या दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरच्या विकासाला गती देण्यासाठी एकत्रितपणे काम करू असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी घरातील मूलभूत सुविधा, पायाभूत प्रकल्प व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचेही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला त्या निर्णयाच्या आदेशाचं पालन करीत उल्हासनगर मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येऊन महापौर आणि उपमहापौर बसवला आहे. शहराच्या विकासासाठी शहराच्या विकासाच्या उद्दिष्टाने हा निर्णय झालेला आहे. या वेळेला खऱ्या अर्थाने उल्हासनगर शहराचा विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी अश्विनी निकम यांची बिनविरोध निवड झाल्यावर माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी, मनोज लासी आदींनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी अश्विनी निकम यांनी पप्पू कलानी यांचा आशीर्वाद घेतला.महापौर अश्विनी निकम यांचे काॅंग्रेस पार्टी तर्फे नगरसेविका अंजली साळवे व रोहित साळवे यांनी अभिनंदन केले .






























