उल्हासनगर दि.५: भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर, ‘योग सर्वांसाठी’ हे ध्येय पुढे ठेवत केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालया अंतर्गत, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना सेल,आरोग्य योगा व नॅचरोपॅथी सेंटर,जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस एस टी महाविद्यालय आणि जीवनदीप महाविद्यालय यांच्या आयोजनातून ५० दिवसीय योग क्रांतीकारी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “योग ही भारताची प्राचीन परंपरा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून तो आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग पोहोचवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.” या प्रसंगी मुरबाड-बदलापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. किसन कथोरे यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र व गोवा क्षेत्रीय संचालक प्रमुख श्री अजय शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष – राज्य संपर्क अधिकारी महाराष्ट्र शासन डॉ. निलेश पाठक, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ओएसडी प्रा. सुशील शिंदे, तसेच ठाणे जिल्हा समन्वयक व एसएसटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जीवन विचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य योगा आणि नॅचरोपॅथी सेंटरचे संस्थापक डॉ. विजय कुकरेजा यांनी तर सूत्रसंचालन प्रा. जीवन विचारे यांनी केले. आभार प्रदर्शन विभागीय समन्वयक प्रा. नीरज मिश्रा यांनी केले.संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा उद्देश असलेल्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.





























